रात्री परमिट रूम बंद करीत असताना मद्य घेण्यासाठी आलेल्या सराईताना बार मालकाने नकार दिला. याचा मनात राग धरून या सराइतासह त्याच्या साथीदारांनी गंगापूररोडवरील शिवाजीनगर येथे असलेल्या बार मालकाच्या घरावर हल्ला चढवत अंगणातील दोन कार पेटवून दिल्या. तसेच स्फोटक पदार्थ फेकत थेट घर पेटविण्याचाही प्रयत्नही या सराईटणी केला असल्याचा आरोप बार मालकाने केला आहे. याप्रकरणी विक्रांत योगेश गुळवे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
शहरातील कार्बन नाका येथे विक्रांत योगेश गुळवे यांचा बीअर बार आहे. बुधवारी रात्री सुमारे 10.30 ते 10.45 च्या दरम्यान कामगार बार बंद करत होते. यावेळी संशयित कृष्णा राजपूत हा दोन अनोळखी साथीदारांसह कारमधून आला. त्याने बार कामगारांना दारू मागितली. मात्र कामगारांनी त्याला परमिट रूम बंद असल्याचे सांगितले. यानंतर तिघांनी परमिट रूमच्या कामगारांना शिवीगाळ केली. याची माहिती मिळताच परमिट रुमचे मालक विक्रांत गुळवे तेथे पोहोचले, तेव्हा राजपूतसह इतरांनी मद्याची मागणी केली असता गुळवे यांनी ‘बार’ बंद झाल्याचे सांगितले. त्याचा राग येऊन राजपूतने गुळवेंना ‘तुला समजणारही नाही, कुठून चॉपर व बंदुकीतून गोळ्या येतील’ अशी धमकी दिल्याचा आरोप गुळवे यांनी केला आहे. धमकी दिल्यानंतर संशयित तेथून निघून गेले.
मात्र, याच रागातून सूड उगवण्याचा कट रचून संशयित गुरुवारी मध्यरात्रीनंतर 2.20 वाजेच्या सुमारास गुळवेंच्या बंगल्याजवळ पोहोचले. त्यांनी अंगणात उभ्या असलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही 700 (MH 15 KC 8989) आणि मॉरिस गॅरेज (MH 15 JT 7227) या दोन कारवर पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे..
घरावर फेकला स्फोटक पदार्थ
कारला लागलेल्या आगीच्या ज्वाळा घराच्या दिशेने पसरल्या. त्यातच संशयितांनी स्फोटक पदार्थ फेकत थेट घर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी आरडाओरडा केल्याने संशयित घटनास्थळावरून पसार झाले. आगीमुळे कारसह घराचे मोठे नुकसान झाले आहे, या प्रकरणी पोलिस ठाण्यात संशयितांवर जाळपोळ, धमकी, नुकसान व जिवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
