ज्या मित्रावर पतीने विश्वास टाकला त्यानेच घात केला, घरी एकटी असल्याने जायचा अन् कायम… छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

ज्या मित्रावर पतीने विश्वास टाकला त्याच मित्राने मैत्रीच्या नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पतीचा बालमित्र असल्याचा फायदा घेत एका १९ वर्षीय तरुणाने २७ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पाचोड पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

अमोल विजय कुलट वय १९, रा. दाभरुळ, ता. पैठण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेचा पती आणि अमोल हे लहानपणापासूनचे मित्र असल्याने त्याचे या कुटुंबाच्या घरी सतत येणे-जाणे होते. मात्र या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला. जानेवारी २०२५ मध्ये आरोपीने पहिल्यांदा पीडितेला बदनामीची धमकी देऊन तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर सतत भीती दाखवून त्याने हे पाशवी कृत्य सुरूच ठेवले.

धमकावून अत्याचार अन् जातीवाचक शिवीगाळ

१८ जानेवारीच्या रात्री जेव्हा पीडितेचा पती घराबाहेर होता, तेव्हा आरोपीने पुन्हा संधी साधली. त्याने पीडितेच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली आणि अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारीन अशी धमकी त्याने दिली. इतकेच नव्हे तर २० जानेवारीला त्याने पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करत तिच्या पतीलाही संपवण्याची धमकी दिली.

गुन्ह्यातील कपडे जप्त कोठडीत रवानगी

पीडितेच्या तक्रारीनंतर पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत अमोल कुलटला तात्काळ अटक केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. गडवे यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले. सरकारी वकील राजू पहाडिया यांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्यातील कपडे जप्त करणे आणि तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का, हे शोधण्यासाठी आरोपीची चौकशी आवश्यक आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *