सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कराड तालुक्यातील सैदापूर गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी खळबळजनक दावा केलाय. सागर यांना तीन मुली आहेत आणि त्या सर्व जिवंत आहेत. तरीही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तिसरी मुलगी मृत असल्याचे दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. अर्ज तपासणी करताना हे उघड झाले. यानंतर तीन अपत्य असल्याचा आक्षेप घेण्यात आला.काय आहे नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
या वादात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे नावही जोडलं गेलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनावर दबाव टाकून अर्ज तपासणीचा निकाल बदलवल्याचा आरोप आहे. सुरुवातीला हा आक्षेप मान्य करण्यात आला होता पण मंत्र्यांच्या हस्तक्षेपाने तो मागे घेण्यात आला, असे तक्रारदार आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले.
अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी या अन्यायाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली असून, सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. ही सुनावणी 27 तारखेला म्हणजे सोमवारी होईल. याचिकेत सागर शिवदास यांच्या उमेदवारीला आव्हान देण्यात आले आहे आणि भाजप नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय आहे निवडणूक नियम?
निवडणूक नियमांनुसार, तीन अपत्य असलेले उमेदवार अपात्र ठरू शकतात, पण फसवणुकीने ते टाळण्याचा प्रयत्न झाल्याने चर्चा जोरात आहे. अपक्ष उमेदवारांच्या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा डागाळली आहे आणि विरोधकांना हल्ला करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून मतदारांमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
पुरावा सादर करणे आवश्यक
सागर शिवदास यांनी कुटुंबातील मुलीच्या स्थितीबाबत पुरावा सादर करणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर सत्य बाहेर येईल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल आणि निवडणुकीची प्रक्रिया अधिक मजबूत होईल, असा विश्वासही नागरिक व्यक्त करतायत.
