हॉस्टेलवर राहून मैत्रिणीचाच घात, रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ-फोटो काढले अन् ‘त्याला’ पाठवले; छ.संभाजीनगर हादरलं

शहरातील सिडको एन-8 परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ज्या मैत्रिणीसोबत एकाच रूममध्ये राहून सुख-दु:ख शेअर केली तिनेच विश्वासघाताची सीमा ओलांडली आहे. हॉस्टेलवर राहणाऱ्या एका तरुणीनं आपल्या रूममेटचे कपडे बदलतानाचे गुपचूप व्हिडिओ आणि फोटो काढून ते आपल्या एका प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समृद्धी शिवाजी जगदाळे (रा. वंजारवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) आणि स्वराज धालगडे अशी प्रियकर आणि प्रेयसीचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी समृद्धी शिवाजी जगदाळे या एम.जी.एम हॉस्टेलमध्ये रूममेट म्हणून एकत्र राहत होत्या. 18 जानेवारी रोजी, पीडित तरुणी कपडे बदलत असताना समृद्धीने संधी साधून आपल्या मोबाईलमध्ये तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ टिपले. हे व्हिडिओ तिने तात्काळ तिचा प्रियकर स्वराज धालगडे याला पाठवून दिले.

जाब विचारताच मारहाण आणि ब्लॅकमेलिंग

काही वेळाने हा धक्कादायक प्रकार पीडितेच्या लक्षात आला. तिने जेव्हा समृद्धीला विचारले की ‘तू माझे फोटो आणि व्हिडिओ का काढले? आणि ते प्रियकराला का पाठवले?’ तेव्हा आरोपी समृद्धी आणि तिचा मित्र स्वराज यांनी तिला सहकार्य करण्याऐवजी उलट मारहाण केली. इतकेच नाही तर ‘जर तू याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिलीस, तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

समृद्धी, स्वराज दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून समृद्धी जगदाळे आणि स्वराज धालगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *