नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये प्रेमसंबंधातून घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणीचे नाव रुचिता राजेंद्र भांगे (वय 21) असे असून, तिचा मूळ मुक्काम आष्टी खुर्द, कळमेश्वर येथे आहे. सध्या ती गिट्टीखदान परिसरात वास्तव्यास होती. आरोपी प्रियकराचे नाव सौरभ जामगडे (वय 24, रा. आष्टी खुर्द) असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरवारी दोघेही संबंधित ओयो हॉटेलमध्ये दाखल झाले. खोलीत गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतप्त झालेल्या सौरभने जवळील चाकूने रुचिताच्या गळ्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रुचिता गंभीर जखमी झाली. हॉटेल कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच तिचा प्रचंड रक्तस्राव झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. आरोपी प्रियकराने पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांच्या हाती न लागण्याचा प्रयत्न करत हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच हॉटेल प्रशासनाने तत्काळ कळमेश्वर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी हॉटेलमधील खोलीची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. तसेच, मृत तरुणी आणि आरोपी यांच्यातील प्रेमसंबंध, वादाचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमीचा सखोल तपास केला जात आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागपूर शहरातील कायदा – सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
