हफ्ता न आल्याने लाडक्या बहिणी संतापलेल्या असतानाच महत्त्वाची अपडेट; आदिती तटकरेंची पोस्ट, म्हणाल्या ’31 डिसेंबर 2025 पर्यंतच…’

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला नसल्याने राज्यात अमरावती, यवतमाळ आणि वाशिममध्ये लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या आहेत. यादरम्यान आदिती तटकरे यांन एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आदिती तटकरेंच्या पोस्टमध्ये काय?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: महत्वाची सूचना! महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

यवतमाळमध्ये लाडक्या बहिणींचा संताप

यवतमाळमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळालेल्या महिलांची महिला व बालकल्याण विभागात गर्दी होत असून त्यांचा संताप बघायला मिळत आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या अशी मागणी या महिला करीत आहेत. महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र शासनाकडे पाठविले असून त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

या योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केली होती. ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. अनेकांची ई केवायसी चुकीची झाली परिणामी दोन दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा वितरित केलेला हप्ता शेकडो महिलांचा लाभ खात्यात जमा झालाच नाही. त्यामुळे महिलांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींचा भव्य मोर्चा

महापालिकेची निवडणूक संपूनही लाडक्या बहिणींचा हप्ता न मिळाल्याने अमरावतीत लाडक्या बहिणी चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी भव्य मोर्चा काढला असून मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या. लाडक्या बहिणींना तात्काळ हप्ता देण्याची मागणी केली आहे. खात्यात पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या आणि पैसे मिळण्याच्या मागणीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन केले. सरकार चुकीच्या पद्धतीने ही केवायसी करत असल्याचा आरोप लाडक्या बहिणींनी केला आहे.

वाशिममध्येही आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव

वाशिम जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता अद्याप अनेक महिलांना न मिळाल्याने संतप्त महिलांनी सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हप्ता न मिळाल्याची तक्रार मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात आल्याचा आरोप करत महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध केला.या वेळी वाहनात बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.मात्र, थकीत हप्ते तात्काळ जमा करण्याची ठाम मागणी महिलांकडून करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *