हातात खडू अन् शिक्षक अचानक… वर्गात विद्यार्थ्यांसमोरच गुरूजींनी जीव सोडला; कोकणात हळहळ

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षक अचानक कोसळून त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. गजानन विनायक मोघे (वय 54, रा. माळवाडी, पो. देवळे, ता. संगमेश्वर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफवली क्र. 1 येथे मोघे गुरुजी अध्यापन करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. ते खुर्चीवर बसले असताना अस्वस्थ वाटू लागल्याने विद्यार्थी घाबरले. विद्यार्थ्यांनी तातडीने ही बाब अन्य शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली.

नेमकं काय घडलं?

मोघे गुरुजींना त्वरित देवळे येथील डॉ. पंकज मांगलेकर यांच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पाली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिकवणी सुरू असताना विद्यार्थ्यांसमोरच ही घटना घडल्याने शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मोघे गुरुजी मितभाषी स्वभावाचे, उत्कृष्ट अध्यापन कौशल्य असलेले शिक्षक म्हणून ओळखले जात होते. अभिनय क्षेत्रातही त्यांचा मोठा अनुभव होता. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून ते उत्तम सूत्रसंचालक म्हणूनही परिचित होते. दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक ही त्यांची खरी ओळख होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *