सोन्या-चांदीच्या दरांचा वाढता आलेख कायम आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने आणि चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये आज नव्याने वाढ झाली. देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये आजपर्यंत सोन्या-चांदीच्या ऐतिहासिक दराची नोंद झाली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातील किती वाढ झाली?
जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराचा दीड लाखांचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या दर जीएसटी सह 1 लाख 51 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 32 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत. नवीन वर्षाच्या अखेरीला सोन्याने दीड लाखांचा तर चांदीच्या दराने 3 लाख 20 हजारचा आकडा पार केला होता. नवीन वर्षांच्या 20 दिवसात सोन्याचे दर 15 हजार रूपयांनी तर चांदीचे तब्बल 78 हजार रुपयांनी वाढले आहे.
जागतिक राजकीय स्थितीमुळे चांदीचे दर वाढले
चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ होण्यासाठी राजकीय परिस्थिती कारणीभूत असल्याचं समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आठ युरोपीय राष्ट्रांवर नवीन शुल्क लावण्याची धमकी दिल्यानंतर ही नवीन विक्रमी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी आता स्वीडनला पाठवलेल्या पत्रामध्ये मला नोबेल दिला नाही. त्यामुळे आता शांततेची अपेक्षा करु नका असं म्हटलं आहे. दुसरीकडे ग्रीनलँडमध्ये सैन्य वाढवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राजकीय संकट निर्माण झालं असून त्याचा परिणाम खजिने, कच्चे तेल आणि धातूंच्या किंमतीवर होत आहे.
केवळ गुंतवणूक म्हणून नाही यासाठीही आहे चांदीची मागणी
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्याच्या चांदी हा सर्वात महत्त्वाच्या धातूंपैकी एक म्हणून उदयास येत आहे. गुंतवणुकीसाठी असलेले चांदीची मागणी वाढत आहे. याशिवाय औद्योगिक उपकरणांमध्ये चांदीची मागणी वाढत आहे. भारतातही या दोन्ही कारणांसाठी चांदीची मोठी मागणी आहे.” औद्योगिक क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील मागणीमुळे चांदीला अधिक दर मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रातील मागणी असल्याने चांदीचे दर दिर्घकाळ चढते राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
