निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधात भाषण केल्यामुळे काँग्रेस महिला उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात महिला उमेदवाराचे पती बचावले आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये हा थरार मंगळवारी 13 जानेवारी रात्री उशिरा घडला होता. शिवाजी भालेराव, असं महिला उमेदवाराच्या पतीचं नाव आहे. झालेला हा हल्ला हा राजकीय नसून दरोडा असल्याचं आता समोर आलं आहे.
संशयितांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना अटक केली आहे. रितेश दिपक पंडित (वय 22), शुभम संजय नरवाडे (वय 19), संघर्ष महेंद्र वगर (वय 19), चांदेश ऊर्फ ओमकार कोंडीबा जाधव (वय 18) आणि वैभव गोपाळ थोरात (वय 19) असं अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा यात समावेश आहे. हे सर्व नांदेड शहरातील रहिवासी आहेत.
‘निवडणुकीत विरोधात भाषण का केलं’?
प्रभाग क्रमांक एकमधून काँग्रेसने शिवाजी भालेराव यांच्या पत्नी सारिका भालेराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मंगळवारी 13 जानेवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर उमेदवाराचे पती शिवाजी भालेराव हे आपल्या मित्रासोबत थांबले होते. याचदरम्यान दुचाकीवर आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने तलवारीचा वार चुकवल्याने ते बचावले. ‘निवडणुकीत विरोधात भाषण का केलं, तुझा बियाणी करतो’, अशी धमकी हल्लेखोरांनी दिली, असं काँग्रेस उमेदवाराच्या पतीने सांगितलं.
