राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मात्र मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या तासाभरामध्येच राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचं दिसून येत आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, नागपूर, मुंबई, नाशिकसारख्या अनेक शहरामंध्ये ईव्हीएम बंद पडल्याने सकाळीच मतदानासाठी आलेल्या नागरिकांना खोळंबून रहावं लागलं. एकीकडे ईव्हीएमसंदर्भात राज्यभरातून तक्रारी नोंदवल्या जात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून राजधानी मुंबईतही अनेक उमेदवारांचे भवतिव्य पणाला लागले आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये लक्षवेधी लढत रंगत असून या वॉर्डात भाजपकडून तेजस्वी घोसाळकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धनश्री कोलगे या निवडणूक रिंगणात आहेत. आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना तेजस्वी घोसाळकर या आपल्या दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. घरात पूजाअर्चा केल्यानंतर अभिषेक यांच्या फोटोला अभिवादन करताना त्यांना गहिवरून आलं.
मुंबई महापालिकेचेमाजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वीच गोळ्या झाडून हत्या झाली होती आणि त्यानंतर तेजस्वी यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत त्या पहिल्यांदाच एकट्या लढत आहेत, पण अभिषेक यांची साथ त्यांना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या वॉर्डमधील लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून धनश्री कोलगे उभ्या आहेत.
ठाण्यात नेमकं घडलं काय?
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सेंट झेवियर्स या शाळेत रूम नंबर 10 आणि 12 या ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ तात्काळत उभे राहावं लागले. रूम नंबर 10 येथील मशीन मध्ये बिघाड होता तर रूम नंबर 12 मध्ये मशीनला करंट (शॉक) लागत होता त्यामुळे हे बिघड दुरुस्त करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
एकही मत पडलं नाही आणि EVM बिघडलं; मुंबईत गोंधळ
मुंबईतील कफ परेड भागातील जी डी सोमाणी मेमोरियल येथे मतदान सुरवात होताच, पहिल्यावहिल्या मतदाराला ईव्हीएमचे बटण दाबले जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कर्मचारी गोंधळले; तर रांगेत थांबलेले मतदार गडबडले. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्ती केली. त्यानंतर मतदार सुरळीत झाले. साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली.
पुण्यात ईव्हीएम मशीन बंद; पहिला तास वाया
सेंट हिल्डज स्कूल गुरुवार पेठ येथे मतदानाचा पहिला तास होऊन गेल्यानंतरही मतदानाला सुरवात झालेली नाही. यंत्रे खराब बदलून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात मतदानाचा पहिला तास वाया गेला आहे.
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड; मतदान प्रक्रिया खोळंबली
प्रभाग 10, प्रभाग 4 मध्ये ईव्हीएम मशीन खराब झालं. तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडलं. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद झालं. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीनमधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड
छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक – 3 बेगमपुरा येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे.
नागपूरमध्ये ईव्हीएम बंद
नागपूर शहरातील प्रभाग 23 मध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होता. शास्त्रीनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम बदलून मतदान सुरु झालंय.
