‘बोटावर लावलेली शाई पुसली जातेय’, मतदारांना येतोय धक्कादायक अनुभव; निवडणूक आयोगावर टीकेची झोड

मुंबईसह राज्यातील 29 पालिकांमध्ये मतदान सुरु आहे. मतदानाआधी पैसे वाटपाचे अनेक प्रकार समोर आले होते. निवडणुकीआधीपासूनच विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जाते. दुबार मतदार, बोगस मतदार असे प्रकार समोर येत आहेत. यात आता आणखी प्रकाराची भर पडलीय. मतदानानंतर बोटांवर शाई लावण्याऐवजी मार्करने निशाणी केली जातेय. ही मार्करची निशाणी बोटावरुन काढता येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा लक्ष्य झालंय.

इव्हीएम मशीन 20 मिनीटे बंद 

मतदानाची टक्केवारी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 6.98 % इतकी आहे. दादर शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यालयातील इव्हीएम मशीन 20 मिनीटे बंद होते. 20 मिनीटे मतदान न झाल्यानं मतदानाची वेळ वाढवली. राज ठाकरे आणि परिवाराचे मतदान याच ठिकाणी आहे. या ठिकाणच्या इव्हीएम मशीनमध्ये मतदानाचे बटण दाबले जात नसल्याने हे मशिन बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियात शेअर केलीय. ज्यातील पहिल्या फोटोमध्ये त्यांच्या बोटावरील मार्करची निशाणी दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत मार्कची निशाणी पुसली गेल्याचे दिसतेय.

काय म्हणाले दुर्गे?

मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जातंय, ती शाई सहज पुसली जातेय शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना ह्याकडे लक्ष द्या! गाफिल राहू नका, असे आवाहन दुर्गे यांनी केलंय.

मतमोजणी 1 तास उशीरा 

उद्या मतमोजणी 1 तास उशीरा सुरु होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. मतदान आणि मतमोजणी यात कमी कालावधी मिळत असल्याने सर्व महापालिकेच्या मतमोजणीला सकाळी नऊ ऐवजी दहा वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे निकाल उशीरा लागण्याची शक्यता आहे.  पाडु मशीनचा मतदान प्रक्रियेशी संबंध नाही असे पालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी स्पष्ट केले.

पालिकेकडून मान्य 

आजच्या मतदानाला बोटावरची शाई वापरण्याऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आलाय. बोटावर मार्कर वापरतांना नखावरील शाई पुसली जातेय, हे आता मुंबई महापालिका आयुक्तांकडून मान्य करण्यात आलंय. शाईऐवजी मार्करचे किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करुन दिले गेल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नखांवरील शाई पुसली जात असल्याचे भूषण गगराणी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *