मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मुंबईत या बुलेट ट्रेनची दोन स्थानकं प्रस्तावित असून ती विरार आणि बोईसर येथे असणार आहेत. या मार्गासाठी पालघर जिल्ह्यात 1.5 किलोमीटर लांबीच्या डोंगराळ बोगद्याचं काम वेगाने सुरू आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पालघरमधील दुसऱ्या डोंगराळ बोगद्याचं यशस्वी काम पूर्ण झाल्याची घोषणा केली. एमटी-५ नावाने ओळखला जाणारा हा बोगदा सुमारे 1.5 किमी लांब असून तो विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे. त्यामुळे हा बोगदा जिल्ह्यातील सर्वात लांब डोंगराळ बोगद्यांपैकी एक ठरला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा पहिला डोंगराळ बोगदा आहे.
कसा आहे मार्ग?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग 508 किमी लांबीचा असून, त्यापैकी 156 किमी मार्ग महाराष्ट्रात येतो. या प्रकल्पांतर्गत डोंगरांमधून एकूण 8 बोगदे खोदण्याचं नियोजन असून, त्यापैकी 7 बोगदे महाराष्ट्रात आहेत. सध्या या बोगद्यांचं काम सुमारे 30 टक्के पूर्ण झालं आहे.
प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबाद हे अंतर अवघ्या 1 तास 58 मिनिटांत पूर्ण होणार आहे. साबरमती, अहमदाबाद, बडोदा, सुरत, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई यांना थेट जोडणी मिळणार असून, या संपूर्ण पट्ट्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
