चोरांनी आंघोळीचा साबणही चोरुन नेला! वृद्ध दांपत्याचा अख्खा संसारच पळवला

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात चोरांनी घऱ फोडून अख्खा संसारच पळवून नेला आहे. कोवाड येथील नेसरी रोडवरील कला महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या 66 वर्षीय वृद्धाच्या बंद घराचा कडा तोडून चोरांनी घरातील सर्व संसारच लंपास केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतःच्या वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी मुलाकडे गेले असताना ही घटना घडली. चोरांनी केवळ सोन्या-नाण्यावरच नव्हे, तर सॅमसंग टीव्ही, फ्रिज, गॅस शेगडी, आटा चक्की आणि अगदी खाण्याच्या डाळी व अंघोळीचे साबणही सोडले नाहीत.

नेमकी घटना काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, सतबा रामा हेब्बाळकर (66) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आपल्या प्रकृतीची तपासणी आणि पुढील उपचारासाठी ते आपल्या मुलाकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला.

चोरांनी काय काय नेले? 

चोरांनी या चोरीत कमालीची मग्रूरी दाखवली असून घराचा जणू पूर्ण ताबाच घेतला होता. चोरांनी सॅमसंग (Samsung) कंपनीचा टेलिव्हिजन, एलजी (LG) कंपनीचा फ्रिज, वाय-फाय (Wi-Fi) राउटर, नवीन मिक्सर आणि इलेक्ट्रिक एक्स्टेंशन बोर्ड, दोन एचपी (HP) गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, बेड-कम-सोफा, धनलक्ष्मी कंपनीची आटा चक्की, कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने, तांब्याची मोठी भांडी, नवीन ब्लँकेट, नवीन टॉवेल, विविध प्रकारचे कपडे (ड्रेस), अगदी वापरायचे साबण आणि स्वयंपाकघरातील भांडी चोरुन नेली आहेत.

फ्रिजमधील डाळी आणि सुका मेवाही चोरला 

या चोरीचे विशेष आणि धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, चोरांनी केवळ एलजी (LG) फ्रिज चोरला नाही, तर त्या फ्रिजमध्ये आणि त्याच्या खालील कप्प्यात साठवून ठेवलेल्या डाळी, सुका मेवा आणि इतर सर्व अन्नपदार्थही सोबत नेले.

जेव्हा हेब्बाळकर कुटुंबीय उपचार घेऊन घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आणि संपूर्ण घर रिकामे झालेले दिसले. या धाडसी चोरीमुळे कोवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. आजारपणात उपचारासाठी गेलेल्या वृद्धाचा अशा प्रकारे संसारच चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *