मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेमध्ये पराभव स्वीकारलेले काही उमेदवार आता नगरसेवक होण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. विधानसभेतील पराभवानंतर महापालिकेची वाट धरणारे विविध पक्षांच्या तिकिटावर 6 माजी विधानसभा उमेदवार निवडणूक लढवत असून, 2 माजी आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदार कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2024 च्या पराभवानंतर नवी संधी
2024 मधील विधानसभा निवडणुकीत अनेक ओळखीचे चेहरे रिंगणात होते. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने काही नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता हेच उमेदवार स्थानिक पातळीवर पुन्हा सक्रिय झाले असून, महापालिकेच्या माध्यमातून राजकारणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पक्ष बदलून पुन्हा मैदानात
भायखळा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या यामिनी जाधव आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग 209 मधून निवडणूक लढवत आहेत. कुर्ला मतदारसंघात अपयश आलेल्या प्रविणा मोराजकर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग 169 मधून उमेदवार आहेत. घाटकोपर पूर्वमध्ये पराभूत झालेल्या राखी जाधव यांना यावेळी भाजपकडून प्रभाग 131 साठी तिकीट मिळाले आहे.
त्याच पक्षातून पुन्हा संधी
वडाळा विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारलेल्या श्रद्धा जाधव ठाकरे गटाकडून प्रभाग 202 मधून निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये वर्सोवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून पराभूत झालेल्या राजुल पटेल यांना आता शिवसेना शिंदे गटाने प्रभाग 161 मधून उमेदवारी दिली आहे. विक्रोळी मतदारसंघातून मनसेकडून पराभूत झालेले विश्वजित ढोलम पुन्हा मनसेकडूनच प्रभाग 119 मधून लढत आहेत.
माजी आमदारांचे वारसदार मैदानात
विधानसभा निवडणुकीत अपयश आलेल्या माजी आमदारांच्या कुटुंबीयांनीही यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत प्रवेश केला आहे. दहिसर मतदारसंघात पराभूत झालेले विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर प्रभाग 7 मधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे. माहीममधून पराभूत झालेले सदा सरवणकर यांच्या मुलगी प्रिया गुरव प्रभाग 191 मधून शिंदे गटाच्या तिकिटावर मैदानात आहेत.
