मुंबईतील पवई येथील व्यावसायिक विमलकुमार गोयंका यांची शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचच्या पश्चिम विभाग सायबर पोलिस पथकाने कोल्हापूर आणि पन्हाळ्यात मध्यरात्री छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतले. कोल्हापूरच्या बापट कॅम्प येथील चेतन मुकुंद पाडळकर (वय 29) आणि पन्हाळा येथील दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय 52) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईने कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली असून, अगदी कंबोडिया-म्यानमारशी जोडल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा धागा कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.
फसवणुकीचं जाळं कसं विणलं?
आंतरराष्ट्रीय टोळीने व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे विमलकुमार गोयंका यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना बनावट ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला ॲपवर मोठ्या रकमांचे जमा दिसवून विश्वास बसवला. गोयंका यांनी 3 लाख रुपये काढून घेऊन खात्री केली; पण नंतर अकाउंट ब्लॉक झाले आणि कर भरण्याच्या भीतीने आणखी पैसे मागितले. एकूण 1 कोटी 10 लाखांचा भरणा झाल्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडला. फसवणूक समजताच गोयंका यांनी मुंबई वेस्ट सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
40 खात्यांवर रक्कम वाटली
तपासात असे उघड झाले की, फसवणुकीची रक्कम मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या 40 बँक खात्यांवर विभागली गेली. यात पन्हाळा येथील दस्तगीर काझी यांच्या खात्यात 7 लाख रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. काझी हे व्यवसायाने आइस्क्रीम विक्रेते आहेत, तर चेतन पाडळकर हे बँकिंग एजंट म्हणून खाती उघडून देत होते. पाडळकरने काझी यांच्यासह इतरांना खाती पुरवली, ज्यातून फसवणुकीची रक्कम वाहली गेल्याचा संशय आहे. चौकशीत काझींचे भाऊ इस्माईल यांना ताब्यात घेतले; पण त्यांची सुटका करण्यात आली.
मध्यरात्रीची वेगळी कारवाई
मुंबई वेस्ट सायबर पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन गच्चे, विजय घोरपडे, संग्राम जाधव यांच्या पथकाने स्थानिक शाहूपुरी आणि पन्हाळा पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री छापे टाकले. पन्हाळ्यातील मुसलमान गल्लीतील काझी यांच्या घरी आणि बापट कॅम्प येथील संत गोरोबा कुंभार वसाहतीतील पाडळकरांच्या घरी एकाच वेळी कारवाई झाली. व्यवसायाने अभियंता असलेल्या पाडळकरच्या अटकेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दोघांनाही शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेवून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि सकाळी मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, टोळीचे धागेदोरे कंबोडिया आणि म्यानमारपर्यंत असून आणखी संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांची खाती फसवणुकीसाठी वापरू नका, असा इशारा दिला आहे. हा तपास सुरू असून, इतर पीडितांची माहिती समोर येऊ शकते.
