कल्याणमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासूने आपल्या मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली. दोघांनीही हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एक पुरावा राहिला, आणि त्याच्याच मदतीने पोलिसांनी गुन्हेगारांचा छडा लावला आहे. कर्पेवाडीमधील जिम्मीबाग परिसरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येचा रक्ताच्या थेंबामुळे पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. घरात मिळालेल्या पुराव्यामुळे महात्मा फुले पोलिसांनी लताबाई गांगुर्डे (वय 60) आणि जगदीश म्हात्रे (वय 67) या दोघांनाही अटक केली. दरम्यान, हत्येच्या 24 तासांतच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या विलास गांगुर्डे यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पत्नी रुपाली गांगुर्डे यांना 10 लाखांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली. तसेच, मयत पतीच्या जागेवर आपल्या नातवाला तेथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असं सासू लक्ष्मीबाईचं मत होतं. मात्र, त्याऐवजी सूनेनं स्वत:साठी रेल्वेत अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. यावरून आपल्या मुलाच्या पश्चात त्याच्या ग्रॅच्युईटीतील काही रक्कम देण्यासाठी सून नकार देत होती. या रागातून सासू लक्ष्मीबाईने आपल्या मित्राच्या मदतीने 1 जानेवारी 2026 रोजी कल्याण पूर्वेच्या जिम्मीबाग, कर्पेवाडी भागात राहत्या घरात सुनेची हत्या केली. या हत्येचा उलगडा महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केला.
‘ती’ चूक पडली महागात
वालधुनी रेल्वे पुलाखाली एका अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह टाकून देण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारी दि. 2 जानेवारीला दिली. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रांना वेग दिला. घटनेचा तपास सुरू असताना लताबाई सुनेचा फोटो घेऊनच फुले पोलीस स्टेशनात गेल्या. 1 जानेवारी 2026च्या रात्री आठ वाजल्यापासून सून रूपाली ही घरातून गायब आहे. अजूनही ती घरी परतली नाही, असं सासूने पोलिसांना सांगितलं. रूपालीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि मनगटावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे पोलिसांना तिच्या मृतदेहाची ओळख पटवणं मोठं आव्हान होतं. फुले पोलिसांनी लताबाईला आपल्या बेपत्ता सुनेचा मृतदेह दाखवताच तिने पोलीस स्टेशनमध्येच टाहो फोडला.
‘त्या’ एका थेंबामुळे सापडले
हीच आपली सून असल्याचं सांगत लताबाईने पोलीस ठाण्यातच आक्रोश केला. पण पोलिसांचा संशय लताबाईकडे अधिक बळावला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने जिम्मीबागेतल्या घराची झडती घेतली. रूपालीच्या घराची लताबाई आणि तिच्या मित्राने साफसफाई केली. पण तरीही फरशीवर आढळलेले रक्ताचे थेंब पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. तपासणीवेळी हे रक्त रूपालीचे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी लताबाईची कसून चौकशी केली असता तिने तिचा मित्र जगदीश म्हात्रेने ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.
