ढगाळ वातावरणावर थंडीची मात; विदर्भात सर्वात थंड रात्र, मुंबईसह कोकणात हवामानाचा कोणता इशारा?

मागील 48 तासांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका पाहायला मिळाला. असं असतानाच काही भाग मात्र इथं अपवाद ठरले, कारण ढगाळ हवामानामुळं पावसाळी वातावरणास वेग मिळाल आणि थंडीचं प्रमाण कमी झालं. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये होणाऱ्या परिणामांमुळं महाराष्ट्रात हे बदल दिसून आले. दरम्यान आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाची स्थिती आवरतं घेत असून, राज्यात थंडी जोर धरताना दिसत आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं किमान तापमानात घटही झाली असून, विदर्भात तापमानात सर्वाधिक घट दिसून आली, जिथं रात्रीचा पारा 7 अंशांवर पोहोचला होता. हे राज्यातील नीचांकी तापमानत ठरलं, तर कोकणातील भिरा इथं पारा 34 अंशांवर असून हे ठरलं राज्यातील उच्चांकी तापमान. पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची अशीच काहीशी स्थिती कायम राहणार असून, कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार पाहायला मिळतील. तर, किनारपट्टी भाग, प्रामुख्यानं कोकण, मुंबई, पालघर इथं वातावरण ढगाळ असेल. तर, घाटमाथ्यावर धुकं आणि दवबिंदू तयार होणार आहेत. मुंबईतील दमट हवामान नागरिकांना चांगलाच घाम फोडेल त्यामुळं ही थंडी शहरात पुन्हा गारठा केव्हा आणते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

विदर्भात थंडीचा यलो अलर्ट 

राज्यात विदर्भ क्षेत्रामध्ये तापमानात मोठ्या फरकानं घट दिसून येईल. ज्यामध्ये अमरावती, गोंदिया आणि नागपूरमध्ये थंडीचा कडाका अधिक तीव्र असेल असा प्राथमिक अंदाज आहे. थंडीची ही लाट आठवडाअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, उत्तर भारतातील हवामान बदलांमुळं राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.

उत्तर भारत पुन्हा गारठला…

जम्मू काश्मीरसमवेत संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या खोऱ्याच बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या पर्वतांवर बर्फाचा एक जाड थर तयार झाला असून, तलावांसह जलस्त्रोतही गोठण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये सल्ला ‘चिल्ला ए कलां’ हे पर्व सुरू असून, यादरम्यान इथं हाडं गोठवणारी थंडी पडते आणि तेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हिमाचलच्या लाहौल खोऱ्यामध्येही थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. उत्तराखंडमध्ये काही भागांत पावसाच्या हलक्या सरी तर कुठं शीतलहर सक्रिय झाल्याचं स्पष्ट होत असल्यानं देशाच्या उत्तरेकडून आता मध्य भारताकडे येणाऱ्या गार वाऱ्यांमुळं थंडीचा कडाका वाढत असल्याचं चिन्हं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *