मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस बंद राहणार; कधीपासून आणि का? जाणून घ्या

 मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र भाविकांना काही दिवस बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी थांबावे लागणार आहे. याचे कारण श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे १-२ दिवस नव्हे तर तब्ब्ल ५ दिवस बंद राहणार आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे की ७ ते ११ जानेवारीदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. हे बंद का ठेवले जाणार आहे, यामागचे नेमके कारण समोर आले आहे.

का राहणार मंदिर बंद?

७ ते ११ जानेवारी या कालावधीत मंदिरातील मुख्य मूर्तीवर पारंपरिक सिंदूर लेपन तसेच इतर आवश्यक धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार देश-विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आधीच माहिती देण्यात आली आहे. या काळात भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, मात्र प्रतिकृती मूर्तीचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिराच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर 

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे. १९ नोव्हेंबर १८०१ रोजी लक्ष्मण विठू आणि देवूबाई पाटील यांनी या मंदिराची उभारणी केली होती. आज हे मंदिर मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. दरवर्षी होणाऱ्या सिंदूर लेपन विधीमुळे या काळात भाविकांची गर्दी अधिक वाढते, त्यामुळे काही दिवस मंदिर बंद ठेवण्याची परंपरा आहे.

१२ जानेवारी किती वाजता उघडणार मंदिर?

सिंदूर लेपन विधी पूर्ण झाल्यानंतर सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी प्रक्षालन विधी, नैवेद्य आणि आरती संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी अचूक १ वाजता गर्भगृहातून नेहमीप्रमाणे दर्शन सुरू होईल. या बदलाची नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर न्यासाने भाविकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *