कारखान्यात महिला कामासाठी गेली, ते परत आलीच नाही; एका घटनेने जीव गेला, बीडमध्ये हळहळ

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात एका 50 वर्षीय महिला कामगाराचा यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शोभा विठ्ठल बनसोडे असे या मृत महिलेचे नाव असून, त्या कारखान्यात साफसफाईचे काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

साफसफाई करताना अनर्थ घडला

मिळालेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नेहमी प्रमाणे शोभा बनसोडे या साफसफाई करण्यासाठी आल्या. त्यांनी साफसफाई करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील साखरेच्या मिक्सरमध्ये त्यांच्या साडीचा पदर अचानक अडकला. यामुळे त्या वेगाने फिरणाऱ्या मिक्सरला जाऊन धडकल्या, ज्यामध्ये त्यांच्या पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनेने परिसरात खळबळ उडाली. या अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तब्बल महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला. या घटनेने शोभा बनसोडे यांच्या घरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा करणे हे कारखान्याच्या प्रशासनाचे कामअसून देखील अशा घटना वारंवार का घडतात असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.याप्रकरणी मृत महिलेचे पती विठ्ठल नामदेव बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. या दुर्घटनेबाबत नातेवाईकांनी कोणतीही तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी कलम 194 अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *