देशभरात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत असून, हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा धुक्याची चादर, थंडीचा कहर आणि हिमवर्षाव अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. मात्र, महाराष्ट्राचं सांगावं तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. अशा या वातावरणाचा परिणाम पुढील 24 तासांमध्येसुद्धा पाहायला मिळणार असून, अंशत: ढगाळ वातावरण आणि त्यामुळं कमाल तापमानात काशी अंशांची वाढ अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थोडक्यात राज्यात गारठा काहीसा कमी होईल. मात्र पहाटे आणि रात्री जाणवणारी थंडी काही इतक्यात पाठ सोडणार नाही.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काही अंशांनी कमाल तापमानात वाढ होईल ज्यामुळं गारठा दिवसा अंशत: कमी असल्याचं जाणवणार आहे. घाटमाथ्यावर मात्र झोंबणारा गार वारा थंडी अद्यापही मुक्काम ठोकून आहे याचीच अनुभूती देणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं पुणे, पाचगणी, कोल्हापूर आणि कोकणासह राज्याच्या इतरही घाट क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात तूर्तास पावसाचा इशारा नाही.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कमाल/ किमान)
पुणे- 29.7 / 10.6
धुळे- 30.0/ 10.0
कोल्हापूर- 29.3/ 16.0
सातारा- 30.9/11.4
रत्नागिरी- 30.1 / 29.2
मुंबई- 29.4/ 21.3
भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात थंडी कायम असेल, प्रामुख्यानं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इथं थंडीची लाट कायम असेल. उत्तर प्रदेशात बहुतांशी धुक्याची चादर असल्यानं नागरिकांना दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून यामुळं रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याचं चित्र आहे.
पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि बिहारच्या काही भागांसाठी आयएमडीनं ‘कोल्ड डे’चा इशारा जारी केला असून, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पश्चिमी हिमालय क्षेत्र जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवस हलका पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमानात घट होऊ शकते असा इशारा जारी करण्यात आला आहे.
