महाराष्ट्र पोलिस खात्यात मोठा फेरफदल झाला आहे. महापालिका निवडणुकांआधी बड्या IPS अधिकाऱ्याचे दमदार कमबॅक केले आहे. महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबतचा औपचारिक आदेश जारी केला आहे. सदानंद दाते हे महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. 3 जानेवारीला दाते पदभार स्वीकारणार आहेत.
सदानंद दाते यांची कारकीर्द
1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परतण्यास केंद्र सरकारने अलीकडेच मान्यता दिली आहे. सदानंद दाते यांनी यापूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केले आहे आणि मुंबईत सह पोलिस आयुक्त (गुन्हे) आणि सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम केले आहे. एनआयए प्रमुख होण्यापूर्वी, सदानंद दाते यांनी महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत, ज्यात मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलिस आयुक्त, सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि मुंबईतील गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांचा समावेश आहे. त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे.
अजमल कसाबशी झटापट
2008 मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सदानंद दाते प्रसिद्धीच्या झोतात आले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात ते कामा रुग्णालयात अजमल कसाबसोबत लढले आणि थोडक्यात बचावले. दहशतवादाविरुद्धच्या त्यांच्या शौर्यामुळे ते नायक बनले. यासाठी त्यांना 2008 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात आले.
डीजीपीचा कार्यकाळ किती असतो?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, डीजीपीचा कार्यकाळ किमान दोन वर्षांचा असणे आवश्यक आहे. रश्मी शुक्ला यांची निवृत्तीच्या फक्त पाच महिने आधी जानेवारी 2024 मध्ये डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना 3 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या नियुक्तीनंतर, सदानंद दाते यांचा कार्यकाळ आता 2027 च्या अखेरपर्यंत राहील.
