संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर अनेक गावांत पाणीटंचाईची टांगती तलवार असताना रत्नागिरी जिल्हादेखील याला अपवाद नसल्याचे दिसत आहे. मागील पाच वर्षाच्या भूजल पातळीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात भूजल पातळीचा स्तर खालावला आहे.
मंडणगड तालुका वगळता अन्य आठही तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यामुळे १० फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवडयात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
भूजल विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल भूजल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. जिल्ह्यात केवळ मंडगणड तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. उर्वरित तालुक्यांच्या भूजल पातळीत मोठी घट झाली आहे.
या वर्षी लांबलेल्या आणि कमी पडलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण ३९ हजार गावांपैकी अनेक गावांत दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्य सरकारने या गावांत विशेष योजना हाती घेतल्या आहेत.
कोकणातही या वर्षी पावसाचा हंगाम लांबला. जूनमध्ये हजेरी लावल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे.
तपासण्यात आलेल्या निरीक्षण विहिरींच्या अहवालानुसार केवळ मंडणगड तालुक्यातील भूजल पातळीत ०.०२ मीटरने वाढ झाली आहे. उर्वरित दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या आठही तालुक्यांत भूजल पातळीत घट झाली आहे.
दापोली तालुक्यातील भूजल पातळी ०.११ मीटरने घट झाली आहे. खेडमधील भूजल पातळी ०.१० मीटर, गुहागर ०.३४ मीटर, चिपळूण ०.१६ मीटर, संगमेश्वर ०.०८, रत्नागिरी ०.१९ मीटर, लांजा ०.३० मीटर आणि राजापूर तालुक्यातील भूजल पातळीत ०.४० मीटरने घट झाली आहे.
भूजल विभागाने सप्टेंबरअखेरीला जिल्ह्याचा सव्रेक्षण अहवाल तयार केला. यासाठी नऊ तालुक्यांतील ६३ निरीक्षण विहिरी निवडण्यात आल्या होत्या. यात मंडणगड ५, दापोली ७, खेड १०, गुहागर ५, चिपळूण १०, संगमेश्वर ९, रत्नागिरी ७, लांजा ३ आणि राजापूर तालुक्यांत ९ विहिरी निवडण्यात आल्या होत्या.
या अभ्यासाअंती प्रत्येक तालुक्यातील स्थिर भूजल पातळीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. यात मंडणगड तालुक्यात १.१३ मीटर, दापोली २.९, खेड १.५८, गुहागर ६.३८, चिपळूण १.८१, संगमेश्वर ४.९०, रत्नागिरी ४.४६, लांजा ६.२३ आणि राजापूर तालुक्यात ३.३४ मीटर स्थिर भूजल पातळी असल्याचा अहवाल नमूद करण्यात आला आहे.

