अक्कलकुवा शहरानजीक असलेल्या सोरापाडा गावाजवळ असलेल्या नदीत सहा ते सात महिने वयाचे पुरुष जातीचं मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आई-वडिलांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट
अक्कलकुवा शहराजवळ असलेला सोरापाडा गावाच्या शिवारात असलेल्या वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात 27 डिसेंबर शनिवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस पाटील शरद वळवी यांना सुमारे सहा ते सात महिने वयाचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आलं. या अज्ञात अर्भकाच्या आई-वडिलांनी अर्भकाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रात फेकून अर्भकाच्या जन्माची लपवणूक करण्यासाठी फेकून दिल्याचं आढळून आलं. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. त्याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस पाटील शरद भरत वळवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मयत अर्भकाचे अज्ञात आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 94,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार नूर पिजारी करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह पाहणी केली.
