तुम्ही शिवभोजन थाळीबद्दल ऐकलं असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरु झालेल्या या योजनेत अवघ्या 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीत नागरिकांना पोटभर अन्न मिळतं. महाराष्ट्रात गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 मूग भात असा सकस आहार मिळतो. ही योजना दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यान्वित असते. ज्यामध्ये सरकार उर्वरित अनुदानापोटी रक्कम देत असते. कोरोना काळात या याजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना झाला. दरम्यान अशाच एका योजनेची चर्चा देशभरात सुरु आहे. जिथे अवघ्या 5 रुपयांमध्ये थाळी मिळतेय. कोणती आहे ही योजना? सविस्तर जाणून घेऊया.
दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी नंतरच्या 101 व्या जयंतीनिमित्त एक योजना सुरु केलीय. याअंतर्गत राजधानी दिल्लीच 100 अटल कॅन्टीन सुरू करण्यात येत आहेत. या कॅन्टीनचा मुख्य हेतू गरीब, मजुरांना आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना स्वस्तात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे कोणालाही उपाशी झोपावे लागणार नाही, अशी सरकारची भावना आहे. ही योजना अटलजींच्या ‘गरिबी ही फक्त पैशांची कमतरता नव्हे, तर संधीची कमतरता आहे’, या विचाराने प्रेरित असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅन्टीनची संख्या
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने 25 डिसेंबर रोजी 45 कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उरलेली 55 कॅंटीन लवकरच सुरू होणार आहेत. दिल्लीतील नरेला, बवाना, शालिमार बाग, राजौरी गार्डन, ग्रेटर कैलाश यांसारख्या ठिकाणी या कॅन्टीन उघडल्या आहेत. एकूण 100 कॅन्टीनमधून दररोज हजारो लोकांना फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
जेवणाची वेळ कधी?
या कॅन्टीन सकाळी 11 ते दुपारी 4 आणि सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत सुरू असतील. प्रत्येक कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 500 ते 1000 लोकांना जेवण मिळू शकणार आहे. एकूण योजना पूर्ण झाल्यावर दररोज एक लाखाहून अधिक जेवण वाटले जाणार आहे. ज्यामुळे दिल्लीत भुकेची समस्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
5 रुपयांत काय मिळणार?
अटल कॅन्टीन अंतर्गत फक्त 5 रुपयांमध्ये एक भरपेट थाळी मिळते. यात दोन चपात्या, मिक्स भाजी (सुक्या स्वरूपात), डाळ, भात आणि लोणचे यांचा समावेश आहे. जेवण साधे पण पौष्टिक असते, जे मजुरांना आणि गरीबांना ऊर्जा देणारी ठरणार असल्याचे सांगण्यात आलंय. सरकारकडून अनुदान दिले जात असल्याने 5 रुपये ही किंमत ठेवणं शक्य झालंय.
पारदर्शकता कशी राखणार?
कॅन्टीनमध्ये स्वच्छता आणि गुणवत्ता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याअंतर्गत टोकन आणि बायोमेट्रिक पद्धतीने जेवण वाटप केले जाणार आहे. ज्यामुळे गैरव्यवहार टाळण्यास मदत होणार आहे. आधुनिक स्वयंपाकघर, एलपीजी आणि आरओ पाणी यांचीदेखील सोय करण्यात आली आहे. दिल्लीच्या निवडणूक जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते.
योजनेचा कसा मिळणार फायदा?
अटल कॅन्टीनमुळे गरीबांना सन्मानाने जेवण मिळेल आणि उपासमारी कमी होईल.हे कॅन्टीन दिल्लीचा आत्मा बनेल, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले. लोकांच्या प्रतिक्रियेनुसार आणखी कॅन्टीन वाढवल्या जातील. अटलजींच्या नावाने ही योजना त्यांच्या सुशासन आणि गरीबकल्याणाच्या वारशाला साजेशी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलंय.
