कोकणात अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या मोठ्या तीव्र विरोध आता या प्रकल्पांचे प्रस्ताव जवळपास गेले. पण आता पुन्हा एकदा कोकणाच्या माथ्यावर इटलीमधून हकालपट्टी करण्यात आलेला घातक विषारी रासायनिक पदार्थ बनवणाऱ्या प्रकल्पाला पायघड्या घालण्यात आल्या आहेत. विषारी रासायनिक पदार्थ बनवणारा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीत सुरू करण्यात आला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी, शेतकरी, बागायतदार तसंच मच्छीमारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
इटलीमधून हद्दपार केलेली, हाकलण्यात आलेल्या ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक या नावाने सुरू आहे. इटलीमधून हाकलण्यात आलेला या कंपनीला कोकणात पायघड्या घालण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर या कंपनीतून काही अंशी प्रोडक्शनही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इथे प्रोडक्शन सुरू झाल्याच्या माहितीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
एकूण वीस उत्पादनांपैकी दोन प्रॉडक्ट सुरू करण्यात आले आहेत. या केमिकल कंपनीमधून ‘पीएफएएस’ या अत्यंत घातक विषारी रासायनिक पदार्थाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र त्यातील वेस्टेज हे तळोजा येथे नेऊन एक हजार डिग्रीला नष्ट केलं जात असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला 4 ऑक्टोबर रोजीच नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आता मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचं पथक या कंपनीची चौकशी करण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे.
