लाठ्याकाठ्या, रॉडच्या हल्ल्यात माजी सरपंचाचा मृत्यू ; संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल अद्यापही न्यायप्रविष्ठ असताना महाराष्ट्रात आणखीन एक अशीच हादरवणारी घटना घडली आहे. जिथे माजी सरपंचाची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या ताब्यावरून कित्येक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वादामुळे पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घटनाक्रम हादरवणारा…

गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून अकरा गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची बुधवारी(17/12/2025 रोजी) क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्यांचा मारा करत राहीली. लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत पठाण यांचा मृत्यू झाला.सदर घटनेबाबत बुधवारी रात्री एका आरोपीला अटक करण्यात आली असून बाकी हल्लेखोर अद्याप पसार आहेत.

काय होता नेमका वाद?

पठाण यांचे कुटुंब छत्रपती संभाजी नगर येथील मूळ ओव्हरगावचेच असून, घरासमोरच त्यांची शेतजमीन  आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या लहान वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. तेव्हा रोषाच्या भावनेन दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात दादा पठण यांता मृत्यू ओढावला. दरम्यान या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी एक संतोष देशमुख?

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या अमानविय क्रूर हत्येला काही दिवसांपूर्वीच  एक वर्ष पूर्ण झाला. परंतू अद्यापही देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. अशातच आता छत्रपती संभाजी नगरात घडलेल्या या घटनेमुळे संतोष देशमुख  यांच्याप्रमाणे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांना देखील वर्ष वर्ष न्याय मिळण्याची वाट पाहावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *