पुण्याला स्मार्ट सिटी बनवा; विद्यार्थ्यांची साद

वीजेचा वापर मर्यादित करा, पुण्याला स्मार्ट सिटी बनवा, अशी साद देत विद्यार्थ्यांनी आज (सोमवार) ‘स्मार्ट सिटी‘ची संकल्पना घराघरांत पोचविण्यासाठी ‘स्मार्ट मार्च‘मध्ये सहभाग घेतला.
 
शहरातील सुमारे 40 शाळांनी आपापल्या परिसरात स्वतंत्ररीत्या मार्च काढला. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे “स्मार्ट सिटी‘ची मोहीम अधिक व्यापक झाली. स्मार्ट मार्चमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी आम्ही मुले प्लँस्टिक पिशव्या वापरत नाही, तुम्ही वापरू नका. पाण्याचा वापर जपून करा. स्वच्छ पुणे सुंदर पुणे, अशा अनेक घोषणांनी जनतेला साद दिली. विद्यार्थ्यांच्या मार्चला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या मार्चमध्ये त्या-त्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “स्मार्ट सिटी‘च्या दिशेने वाटचाल करताना विद्यार्थ्यांमार्फत ही संकल्पना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्याचा या मार्चचा उद्देश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, शनिवार पेठ, डेक्कनसह धायरी, गोखलेनगर, हडपसर, कात्रज, स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, कर्वेनगर, वारजे, कॅम्प, येरवडा परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मार्चमध्ये सहभागी झाले.
 
केंद्र सरकारच्या “स्मार्ट सिटी‘ प्रकल्पाची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.. या प्रकल्पाबाबत पुणेकरांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी शहरात “स्मार्ट मार्च‘ काढण्याचे आवाहन मुख्याध्यापकांना या वेळी करण्यात आले होते. त्याला शहराच्या विविध भागांतील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “मार्च‘चे नियोजन केले होते. या स्पर्धेत पुण्याला “नंबर वन‘ करण्यासाठी शाळांचा हा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *