कर्करोग म्हणजे थेट मृत्यूशीच गाठ. कर्करोग कधी होतो व शरीराचा ताबा घेतो हे अनेकांना कळत नाही. वेळेवर निदान न झाल्याने अनेक रुग्णांना थेट मृत्यूचे दार गाठावे लागते.
या समस्येवर मात करण्यासाठी परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने खास डॉक्टरांसाठी ‘टय़ुमर नॉड अॅण्ड मेटासॅटिस’ (टीएनएम) या नव्या अॅपचे उदघाटन केले. याद्वारे कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे यांची माहिती रुग्णाला अवघ्या ३० सेकंदात कळणार आहे.
टाटा मेमोरिअलच्या डॉक्टरांनी जनतेमध्ये कर्करोगाबाबत माहिती करून देण्यासाठी या हे अॅप तयार केले. अॅँड्रॉईड मोबाईलधारक मोबाईलमधील प्ले-स्टोरद्वारे हे अॅप्लिकेशन मोफत डाऊनलोड करू शकतात. हे अॅप खास डॉक्टरांसाठी बनवले असून त्याचा वापर सर्वसामान्य नागरिकही करू शकतात.
विशेषत: या अॅपचा वापर इंटरनेटशिवायही करता येणार आहे. या अॅपमध्ये गरज असलेली माहिती भरल्यास अवघ्या ३० सेकंदात कर्करोग कोणत्या स्थितीत आहे, याचे निदान होते. जगभरातील डॉक्टर हे अॅप डाऊनलोड करू शकतात.
दरम्यान, सध्या या अॅपवर काम सुरू आहे. मात्र, तरीही रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना आवश्यकतेनुसार या अॅपवर उपलब्ध असलेल्या पर्यायांचा पुरेपूर वापर करता येईल.
येत्या काही महिन्यात आणखी काही पर्याय नव्याने देण्यात येतील. जेणेकरून डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांना कर्करोगाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ते अतिशय फायदेशीर ठरेल, असे मत टाटा रुग्णालय समूहाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केले.
‘एका क्लिक’वर डॉक्टरांना मिळणार माहिती
कर्करोगाचे ६५ प्रकार आहेत. त्यामुळे, प्रत्येक डॉक्टरांना या आजाराच्या सर्व प्रकाराबाबत अभ्यास करता येत नाही. यासाठी सर्व प्रकारचे कर्करोग व त्याचे टप्प्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो.
परंतु, या नव्या अॅपद्वारे डॉक्टर्स एका क्लिकवर त्यांना हवी त्या आजाराची माहिती व उपचारपद्धती अवघ्या काही सेकंदात मिळवू शकतात. याशिवाय या अॅपमुळे देशभरातील डॉक्टरांना विशेषत: दुर्गम भागात राहून काम रुग्णसेवा करणा-या डॉक्टरांना कर्करोगाबाबत निदान करण्याबरोबरच त्यांची तीव्रता जाणून घेण्यासाठी मदत होईल, असा दावा टाटा रुग्णालयाच्या डॉ. पलक पोपट यांनी केला.
चौघांनी एकत्र येऊन बनवले अॅप
टाटा रुग्णालयातील चार डॉक्टरांनी हे अॅप तयार केले आहे. यात टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. मीनाक्षी ठाकूर, डॉ. पलक पोपट व डॉ. नीलेश साबले यांचा समावेश आहे. सहा महिने यावर काम केल्यानंतर हे अॅप प्रत्यक्षात तयार करण्यात आलेले आहे.

