मृत घोषित केलेला इसम अचानक जिवंत झाला तर काय होईल? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, मुंबईत डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक जीवंत झाला आहे. लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका बेशुद्ध व्यक्तीला मृत घोषित करून लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची रवानगी पोस्टमार्टमसाठी केली. मात्र, मृत घोषित केलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके चक्क सुरू होते. हा सगळा प्रकार पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या इसमाला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात भरती केलं. जर पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता.
या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या डीनकडे प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे. हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

