महिलांच्या डब्यात शिरला, हटकताच 18 वर्षीय तरुणीला धावत्या पनवेल लोकलमधून ढकललं;

मुंबईमधील पनवेलमध्ये गुरुवारी 18 डिसेंबर रोजी एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीला महिलांनी हटकल्याने त्या व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खारघर येथील एका शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने पनवेल स्थानकातून फलाट क्रमांक तीनवरून गुरुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास सीएसएमटी गाडी पकडली. यावेळी तिच्यासोबत मैत्रीणही होती. लोकल सुटण्यापूर्वी शेख अख्तर नवाझ (वय 50) हा महिलांच्या डब्यात चढला. शेखला डब्यातील महिलांनी जाब विचारला असता तो वाद घालू लागला. रागाच्या भरात त्याने धावत्या लोकलमधून तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला. त्यामुळे तरुणी लोकलमधून खाली रेल्वे रुळांवर पडली. त्यात ती जबर जखमी झाली. या संतापनजक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात दिसत आहे, या व्यक्तीला काही नागरिकांनी रेल्वेतून बाहेर काढलं.

रेल्वे स्थानकातून पळण्याचा प्रयत्न

दरम्यान, तरुणीला ढकलल्यानंतर आरोपी शेख अख्तर याने खांदेश्वर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील महिला प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली असल्याने पोलिसांनी त्याला खांदेश्वर स्थानकात ताब्यात घेतले. त्यानंतर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात बीएनएस कलम 109 (जिवे मारण्याचा प्रयत्न), भारतीय रेल्वे अधिनियम कलम 162 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक संतुलन बिघडल्याचं समोर

आरोपी शेख हा फिरस्ता असून त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे आढळले असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *