सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंगवर, भरधाव वाहनाची जोरदार धडक; बीडमधील तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा नगरमध्ये करुण अंत

पोलीस दलातील एक तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (वय 29) यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. ही भीषण घटना गुरुवारी रात्री कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात घडली. एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक वाहनासह पसार झाला. अंमलदार सुदाम पोकळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे रहिवासी होते. सध्या ते अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असून कर्जत पोलीस ठाण्यातर्गत असलेल्या राशीन पोलीस चौकीत त्यांची नियुक्ती होती. गुरुवारी रात्री सुदाम पोकळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. गस्त घालत असताना एका भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

धडकेनंतर वाहन घेऊन चालक फरार

अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस सध्या या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा कसून शोध घेत आहेत. सुदाम पोकळे यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यानं सर्वत्र दुःख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या चिंचाळा या मूळ गावीही या घटनेमुळे शोककळा पसरली असून, एका उमद्या तरुणाला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सुदाम पोकळे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं पोकळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित वाहनांची माहिती गोळा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *