बीड शहरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पालवण रोडवरील पालवण चौक परिसरात राहत्या घरातून चालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी रोजी दुपारी ‘अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष’ बीडच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना एक विश्वसनीय बातमी मिळाली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालवण चौकाजवळ, आशा पवार नावाच्या महिलेनं अशोक गदळे नावाच्या पुरुषाच्या मदतीने आपल्या घरात महिलांना बाहेरून बोलावून वेश्या व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती समोर आली होती.
डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा
वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे आणि पल्लवी जाधव यांच्या पथकाने पंचासह पालवण रोडवर सापळा रचला. पोलिसांनी एका डमी ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवले. तिथे उपस्थित असलेल्या अशोक गदळे याने वेश्यागमनासाठी डमी ग्राहकाकडून 1 हजार रुपयांची मागणी केली आणि त्याला वरच्या मजल्यावरील खोलीत जाण्यास सांगितलं. डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे पैसे देऊन पोलिसांना इशारा केला. इशारा मिळताच पोलिसांनी घरात प्रवेश करून छापा टाकला. यावेळी अशोक ज्ञानोबा गदळे (वय 61, रा. मादळमोही, ता. गेवराई) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटा त्याच्याकडे सापडल्या. तसेच, घराची झडती घेतली असता पोलिसांना 12 न वापरलेले निरोध आढळून आले.
धक्कादायक माहिती उघड
या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. तिची विचारपूस केली असता, अशोक गदळे आणि आशा सुंदर पवार (वय 45, रा. पालवण रोड) हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना बोलावून घेतात आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात, असं तिनं सांगितलं.
