भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागातील पारिजात राहिवासी इमारतीमध्ये बिबट्या शिरला आहे. भर वस्तीत बिबट्याने शिरकाव केल्याची धक्कादायक घटना भाईंदर परिसरात समोर आली आहे. नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने हल्ला करत तिघांना जखमी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. बिबट्या नागरी वस्तीत शिरल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. बिबट्याचा वावर भरवस्तीत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
भाईंदरमधील इमारतीत बिबट्याचा वावर
भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरात बिबट्या वावरत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. बिबट्याचा वावर परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. अद्यापपर्यंत बिबट्याने तीन स्थानिक रहिवाशांवर हल्ला केला आहे.
तिघांवर बिबट्याचा हल्ला
नागरी वस्तीत शिरलेला हा बिबट्या शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तलाव रोड परिसरातील पारिजात या इमारतीत बिबट्या शिरला. बिबट्याने हल्ला करत तीन जणांना जखमी केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही जखमींना अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या एका तरुणीला इमारतीतील एका फ्लॅटमधील खिडकीतून बाहेर काढलं. तर एका खोलीत बिबट्याला जेरबंद ठेवण्यात आलं आहे. वनअधिकारी दाखल झाले असून त्यांनी बिबट्याला इंजेक्शन देत त्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. बिबट्या भरवस्तीत आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबतची माहिती वनविभागाला देखील देण्यात आली. अग्निशमन जवानांनी बिबट्याला एका खोलीत बंद करून तरुणीची सुखरूप सुटका केली असल्याचं कळतं. नागरी वस्तीत शिरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न वन विभाग, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनामार्फत सुरू असून परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
