‘अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध, पण..’; जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 लाखांची मागणी, LCBने सापळा रचला अन्…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रादाराकडून 3 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षकाला एसीबीने अटक केली आहे. नितीन लिलाधर ठाकूर (वय 46, रा.देवपूर, धुळे) असं या शिक्षकाचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील तक्रारदार यांना स्वतःचे व बहिणीचे हिंदू ठाकूर या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे येथे अर्ज केला होता. परंतु, सुमारे तीन वर्षे होवूनही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी सदर कार्यालयात जावून तेथील लिपीकाकडे चौकशी केली. लिपीकाने त्यांना सदर कार्यालयातील जात पडताळणी प्रमाणपत्राची कामे न्यू सिटी हायस्कूल येथील शिक्षक नितीन ठाकूर हे करतात, त्यामुळे त्यांना भेटा, असं सांगीतलं.

तक्रारदार यांनी शिक्षक नितीन ठाकूर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रादाराला आपले समितीच्या अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचं सांगून आपल्यामार्फत पैसे घेवून ते जात पडताळणीचे काम करुन देतात, असं सांगितलं. तसेच अधिकाऱ्यांच्या नावाने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करुन शिक्षक नितीन ठाकूर याला अटक करत त्याच्याविरोधात धुळे पोलिसांत गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, पो.हे.कॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पो.कॉ. मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पो.हे.कॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

एका दिवसाची मिळाली पोलीस कोठडी

अनेकवेळा पैसे देण्याचे ठरले पण आरोपी नितीन ठाकुर हा पैसे घेण्यास टाळाटाळ करत होता. अखेर चार महिन्यानंतर अर्थात काल गुरुवारी रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने काल गुरुवारी दुपारी सापळा रचला. लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नितीन ठाकूर याला अटक केली. त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ठाकूर याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *