दारूच्या नशेत असलेल्या उसाने भरलेल्या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मिरी गावावर शोककळा पसरली आहे. पांढरीपूल–शेवगाव रस्त्यालगत एकनाथनगर परिसरात मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजता भरधाव उसाच्या ट्रकने उभ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गणेश किसनराव वाघ (39) आणि तेजस देविदास जगताप (19, दोघेही रा. मिरी) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
धडकेनंतरही थांबण्याऐवजी ट्रक चालकाने मृतांची दुचाकी ट्रकखाली अडकलेली असतानाच वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. शिंगवे परिसरात पोहोचल्यावर दुचाकी रस्त्यावर घसरून पडली. पुढे बेफाम वेगात जाताना ट्रकने नागरिकांना हुलकावणी दिली. काही जण थोडक्यात बचावले. पांगरमल ते खोसपुरीदरम्यान ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक देत मोठं नुकसान केलं. ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचवला. अखेर नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगतच्या शेतात घुसून थांबला. या अपघातात ट्रक चालकही किरकोळ जखमी झाला आहे.
दारूच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच मिरी आणि परिसरातील ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी चालकाचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत जीवघेणा प्रवास करणाऱ्या या ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. मृत गणेश वाघ हे इलेक्ट्रिक लाइट फिटिंगचे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन विवाहित बहिणी आणि दोन लहान मुलं असं कुटुंब आहे. तर तेजस जगताप हा बांधकाम साहित्य दुकानात कामगार होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण असं कुटुंब आहे. घरातील कर्ती मुलं गमावलेल्या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
भरधाव ट्रक वांबोरी येथील ‘प्रसाद शुगर’ या खासगी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करत होता. ट्रक चालक आणि मालक हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असल्याची माहिती आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी? आणखी किती बळी? मिरीतील या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या ढिसाळ नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
