एका सेल्फीने पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नर्मदा नदीच्या धुंधर पर्यटन क्षेत्रात नर्मदा नदीच्या काठावर फोटोसाठी पोज देत असताना एका जोडप्याला खूप महागात पडलं. फोटो काढत असताना, पत्नी घसरली आणि नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेली. त्यातच बुडाल्याने तिचा मृत्यू झाला. तब्बल 24 तासांनंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. 36 वर्षीय स्वाती या आपले पती आशिष गर्ग आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीला सोडून कायमच्या या जगातून निघून गेल्या आहेत. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, पती आशिष गर्गला या घटनेने इतका मोठा धक्का बसला आहे की त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नाहीये. ते कोणाशीही काही बोलत नाहीये.
कुटुंबातील सदस्यांच्या मते, ऑर्डनन्स फॅक्टरीत ज्युनियर वर्क्स मॅनेजर आशिष गर्ग त्यांच्या पत्नी स्वाती, आई आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांनी प्रथम त्रिपुरा सुंदरी मंदिराला भेट दिली, नंतर ते भेडाघाट परिसरात गेले. संध्याकाळ झाली होती आणि हे कुटुंब नर्मदा धबधब्याजवळ फोटो काढण्यात व्यस्त होते. तेव्हा स्वाती या एका खडकाजवळ फोटो काढत होत्या. तेवढ्यात अचानक त्यांचा पाय घसरला आणि काही सेकंदातच त्या नर्मदेच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्या. कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही.
