महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरला ड्रग्जच्या विळखा पडल्याचे दिसत आहे. जागतिक पर्यटनस्थळ पाचगणीमध्ये ड्रग्सचा शिरकाव झाले आहे. मुंबईहून आलेल्या 10 पर्यटकांना अटक करण्यात आली आहे. या पर्यटकांकडून 42.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये अंमली पदार्थांचा शिरकाव रोखण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखा व पाचगणी पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई केली. मुंबईहून आलेल्या 10 संशयित पर्यटकांना अटक केली आहे. या कारवाईत कोकेनसदृश अंमली पदार्थांसह दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा एकूण 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री पाचगणीतील घाटजाई मंदिर व विस्टा ग्रॅन्ड सोसायटी परिसरात छापा टाकण्यात आला. स्कोडा रॅपीड व एम.जी. हेक्टर या वाहनांमधून आलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत संबंधित आरोपी पाचगणी शहरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यात झालेल्या 115 कोटींच्या एमडी ड्रग्स कारवाईनंतर ही जिल्ह्यातील दुसरी मोठी कारवाई ठरली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पर्यटननगरी पाचगणीमध्ये ड्रग्सचा शिरकाव कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे. सध्या थंडीचा हंगाम सुरु आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आणि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथं पर्यंटक मोठ्या भारतासब जगभरातून संख्येने फिरायला येतात.
