चारचाकी गाडीवर कुऱ्हाड मारल्याचा राग आल्यानं रागाच्या भरात त्याच कुऱ्हाडीने गाडीवर कुऱ्हाड मारणाऱ्या व्यक्तीस मारहाण करुन जीवे मारल्याची घटना घडली. पंढरी निवृत्ती नाडेकर (रा. उंटवाडी टाकेद खुर्द) असं मृताचं नाव असून, संशयित शिवराम चिंधू गंभीरे (वय 68, रा. उंटवाडी, टाकेद खुर्द) यास घोटी पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली. इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द येथे बुधवारी दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी संशयिताच्या घरासमोरच ही घटना घडली. या प्रकरणी संशयितास अटक करुन त्याच्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो’
उंटवाडी शिवारात पंढरी नाडेकर याने ‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो’, अशी विचारणा करीत शेतमालक असलेल्या शिवराम गंभीरे याच्या चारचाकी गाडीचे नुकसान केलं. कारचे नुकसान केल्याने राग अनावर झाल्यानं शिवराम गंभीरे याने पंढरीच्याच हातातील कुऱ्हाड हिसकावून त्याला मारहाण करुन जीवे ठार मारले. रोशन भाऊराव नाडेकर याच्या फिर्यादीवरुन शिवराम गंभीरे याच्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सुरेखा देवरे पुढील तपास करत आहेत.
