जेवणाच्या ताटात पाल; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील किळसवाणा प्रकार, 28 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

छत्रपती संभाजी नगरमध्ये समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल आढळून आली आहे. एक नंबरच्या मेसमध्ये गवारच्या भाजीमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात ही मृत पाल आढळली. यामुळे ज्यांनी जेवण केले होते त्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर 28 विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सहायक आयुक्त यांना वसतिगृहात बोलावले. या वेळी सहायक आयुक्त यांनी ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यापूर्वीही मेसमध्ये सडकी फळं दिल्याच्या, पोह्यामध्ये झुरळ, अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय.

यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मध्ये मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात देण्यात येणाऱ्या जेवणात किडे निघाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या या मुलींनी जेवण न करता तहसील कार्यालय गाठून तहसीलदाराकडे तक्रार दिली. ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता शासनाने वस्तीगृह सुरू केले मात्र याच वस्तीगृहामध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणात किडे निघत आहे, तर, या मुलींना सडके फळ देण्यात येत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करूनही या प्रकरणाची कोणी गांभीर्याने दखल घेत नसल्याने विषबाधा ही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुली आणि पालक संतप्त झाले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी आता समाज कल्याण विभाग काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय.

कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर इथल्या हॉटेल मनोरा मधील जेवणात पाल आढळून आली होती. विवेकानंद कॉलेज मधील काही विद्यार्थी हॉटेल मनोरा मध्ये जेवायला गेले होते, त्यावेळी त्याच्या जेवनात मेलेली पाल आढळून आली. त्यांनतर या विद्यार्थ्यांनी ही बाब हॉटेलच्या प्रशासनाच्या  दाखवली. या विद्यार्थ्यांनी सर्व ग्राहकाच्या समोर जेवणात पाल  दाखविल्यामूळ हॉटेलच्या बाऊंसरांनी या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.या प्रकरणी रात्री उशिरा पर्यत राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *