21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सहयोगाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये कोळसा माफियांवर छापे टाकले. ही कारवाई इतकी व्यापक होती की 100 हून अधिक ईडी अधिकाऱ्यांनी 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. पश्चिम बंगालमध्ये 24 ठिकाणे आणि झारखंडमध्ये 18 ठिकाणे लक्ष्य करण्यात आली, ज्यात रांची ते धनबादपर्यंतचे कोळसा व्यापारी अड्डे, घरगुती निवास, टोल कलेक्शन बूथ आणि चेकपॉइंट्सचा समावेश होता. यावेळी नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.
बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि वाहतुकीच्या प्रकरणांशी संबंधित ही ई़डी रेड होती. शेकडो कोटी रुपयांचे सरकारी महसूलाचे नुकसान उघड करण्यासाठी ही रेड टाकण्यात आली होती. याला सर्वात मोठी ईडी रेड असं ईडीने म्हटलंय.
धनबादमधील प्रमुख कोळसा व्यापारी एल.बी. सिंग आणि त्यांचे भाऊ कुंभनाथ सिंग यांची कोळसा आउटसोर्सिंग कंपनी रेडच्या लक्ष्यस्थानी होती. याशिवाय अनिल गोयल, संजय उद्योग, लाल बाबू सिंग आणि अमर मंडल यांच्याशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
एल.बी. सिंग हे 10 वर्षांपूर्वी बीसीसीएल टेंडर घोटाळ्यात सीबीआयच्या निशाण्यावर होते. ज्यात आरोपीने सीबीआय टीमवर गोळीबारही केला होता. कोळसा माफियांच्या जाळ्यातील प्रमुख व्यक्तींवर कारवाईचा फास आवळण्यात आलाय. बेकायदेशीर खाणकाम, वाहतूक आणि महसूल चोरीच्या साखळीला उघड करण्यासाठी सीबीआय, ईडी आक्रमक झालेली दिसून येते.
रोख रक्कम जप्त
छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. विशेषतः500 रुपयांच्या नोटांनी भरलेले ब्रीफकेस आणि बॅगा सापडल्या, ज्यामुळे काळ्या पैशांचा उलगडा झाला. अधिकाऱ्यांच्या मते, एकूण जप्त मालमत्तेचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे, ज्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमचा मोठा वाटा आहे. ही जप्ती बेकायदेशीर कोळसा व्यवहारातील कमिशन आणि महसूल चोरीचे पुरावे म्हणून उपयुक्त ठरेल. ईडीने हे सर्व बँक खात्यांशी जोडलेले असल्याचेही नमूद केले, ज्यामुळे मनी लॉन्डरिंगच्या चौकशीला वेग मिळेल.
ईडी अधिकाऱ्यांच्या अंगावर कुत्रे
छाप्यांच्या वेळी एल.बी. सिंग यांच्या निवासस्थानी एक विचित्र घटना घडली, ज्यामुळे ईडी अधिकाऱ्यांना त्रास झाला. ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करु नये यासाठी सिंग यांनी त्यांचे पाळीव कुत्रे मोकळे सोडले. कुत्रे घरभर फिरत होते. अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते भुंकू लागले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना प्रवेश करण्यापासून अडवले. अचानक घडवून आणलेल्या या प्रकारामुळे सुरुवातीला अधिकारी भांभावले. पण नंतर पोलिसांच्या मदतीने ते घरात शिरले आणि शोध सुरू झाला.
ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केलेली मालमत्ता आणि पुराव्यांमुळे दोषींवर मनी लॉन्डरिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप होऊ शकतात. ईडीने पुढील दिवसांत आणखी छाप्यांचा इशारा देत कोळसा खाणकामातील भ्रष्टाचार उखडून टाकण्यास कटीबद्ध असल्याचे म्हटलंय.
