नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे. या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. निर्मला गावित आपल्या घराबाहेर नातवाला घेऊन फिरत असताना पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपधातात त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात होता. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
निर्मला गावित यांचा काल अपघात झाला होता. निर्मला गावित घराच्या बाहेर नातूला फिरवत होत्या. यावेळी रस्त्यावर मागून आलेल्या गाडीने गावित यांना जोराची धडक दिली. गाडीचालक यावरच थांबला नाही. त्याने निर्मला गावित यांना काही फुटापर्यंत फरफटत नेलं. या घटनेत सुदैवाने निर्मला गावित या सुदैवाने बचावल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. काल झालेल्या या भीषण अपघाताच्या घटनेचा थरारक व्हिडिओ आज समोर आला आहे.
अपघातानंतर निर्मला गावित यांची पहिली प्रतिक्रिया
लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत होते त्यामुळे या अपघातात आपण बचावल्याची प्रतिक्रिया निर्मला गावित यांनी दिली आहे. “मला काही लक्षातच आलं नाही. मी नातवासोबत वॉक करायला निघाले होते. अचानक मागून धड असा आवाज आला आणि मी बोनेटवर आले. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आले. तेवढंच मला आठवतं. घटनेनंतर मला खुर्चीवर बसवले, असं सांगत आहेत. पण मला ते आठवत नाहीय. मी घराजवळच फिरत होते. नातवाचा हात धरला नव्हता. त्यामुळे तो बाजूला होता. आता व्यवस्थित आहे. आज मी खूप रिलॅक्स आहे. काल मला जास्त त्रास होत होता. इथे आल्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार केला”
