बाप रे बाप, ठाणे सिव्हिल रुग्णालयात साप

रुग्णालयात सर्वसाधारणपणे आपण दोन कारणांसाठी जातो. एक तर आपण स्वत: आजारी असतो तेव्हा जातो. अन्यथा आपल्या घरचे किंवा नातेवाईक आजारी असतील तर जातो. रुग्णांना रुग्णालयापेक्षा सुरक्षित जागा कुठेच नाही, असं आपण मानतो. कारण तिथे डॉक्टरांसारख्या देवमाणसांकडून अनेकांचा पुनर्जन्म होतो. अनेकांची शारिरीक आणि मानसिक व्याधी इथे दूर होते. त्यामुळेच रुग्णालयांना विशेष महत्त्व आहे. तसेच दररोज अनेक जण रुग्णालयांमध्ये जात असतात. खासगी रुग्णालयांपेक्षा सिव्हील रुग्णालयांमध्ये गर्दी जास्त असते. तिथे काम करणारा वैद्यकीय स्टाफ देखील मोठा असतो. त्यामुळे तिथलं वातावरण हे सुरक्षित असतं, असं मानलं जातं. पण याच सुरक्षित वातावरणात साप सापडला तर? अनेकांची पळापळ होईल. तसाच प्रकार ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज झाला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या खेडोपाड्यातून आलेल्या रुग्णांची वर्दळ… शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांची धावपळ, अशा वातावरणात ठाणे सिव्हिल रुग्णालयातील कक्षात साप आढळल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या प्रकाराने रुग्णांसह डॉक्टर आणि नर्स, तसेच कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण या घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बिनविषारी धामण

“संबंधित तरुणाने सर्पदंशानंतर बिनविषारी धामण जातीचा सर्प घेऊन रुग्णालयात प्रवेश केला होता. त्याच्या हातातून अचानक साप सुटून हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेनंतर स्वतः हा तरुण साप घेऊन येथून निघून गेला. या घटनेत कोणाला दुखापत झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *