गर्लफ्रेण्डने अबोला धरून अन्य तरुणासोबत बोलणे सुरू केल्याने संतप्त माजी प्रियकराने साथीदाराच्या मदतीने चाकूहल्ला करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केडीके कॉलेज रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. नॅव्ही (वय 21), असे जखमी तरुणाचे नाव आहे. संकेत वंजारी (वय 24, रा. कवेलू क्वॉर्टर, नंदनवन), वैभव अशोक तान्नेलवार (रा. वृंदावननगर) व त्याचे दोन साथीदार, अशी गुन्हा दाखल केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
नंदनवन पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नॅव्ही हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथम वर्षाला शिकतो. संकेतही शिक्षण घेत आहे. रिया (नाव बदलेले) ही तरुणी आधी संकेतची गर्लफ्रेण्ड होती. सहा महिन्यांपासून तिने संकेत याच्यासोबत अबोला धरला. ती नॅव्हीसोबत बोलायला लागली. त्यामुळे संकेत संतापला. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास नॅव्ही हा रियासोबत मोबाइलवर बोलत होता. यावेळी संकेतने तिच्या मोबाइलवर संपर्क साधला. रियाने त्याला ‘कॉन्फरन्स’वर घेतले असता संकेतने नॅव्हीला शिवीगाळ केली. त्यानंतर वैभव यानेही नॅव्हीला शिवीगाळ करीत मर्डर करण्याची धमकी दिली. नॅव्हीने मोबाइल बंद केला. त्यानंतर नॅव्ही हा मित्र राज व अंशुल या दोघांसोबत केडीके कॉलेज रोडवरील झिलपे डेकोरेशनजवळ बोलत होता.
संकेत व त्याचे दोन साथीदार मोटारसायकलने तिथे आले. त्यांनी नॅव्हीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने वैभव तेथे आला. त्याने नॅव्हीला मारहाण केली. वैभवने खिशातून चाकू काढून संकेतला देत ‘याला मारून टाक’, अशी चिथावणी दिली. संकेत याने त्याच्या हातातील चाकूने नॅव्हीच्या गळ्यावर वार केले. नॅव्हीचे मित्र मदतीसाठी धावले असता चौघांनी त्यांनाही मारहाण केली. नॅव्हीने मदतीसाठी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. यादरम्यान संकेत, वैभव व त्याचे साथीदार तेथून पळाले. मित्रांसह नॅव्ही हा नंदनवन पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
