मित्र बनला शत्रू, किरकोळ विषय, पण राग अनावर, अक्षरश: जीव घेतला, कोल्हापूर हादरलं

कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसर हादरून गेला आहे. संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या मागील शेतात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये सोमवारी रात्री किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. मंगल विभीषण मांझी (वय 35, मूळ ओडिसा) या गवंडी मजुराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला असून, या हल्ल्यात त्याचा सहकारी संजय निहाल हा देखील जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदन (वय 25) याला अटक केली आहे.

परप्रांतीय कामगारांमधला वाद

मृत मंगल मांझी हे मूळचे ओडिसा राज्यातील असून, गेल्या काही वर्षांपासून ते संभापूर येथील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस असलेल्या शेतातील भाड्याच्या खोल्यांमध्ये इतर कामगारांसह राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलं ओडिसामध्ये राहतात. बांधकाम क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली होती. सोमवारी दुपारी देवश्री प्रफुल्ल चंदन हा मजूर देखील म्हणजे यांच्या खोलीमध्ये राहण्यासाठी आला होता. यापूर्वी तो गंधर्व फाटा परिसरात राहत होता, मात्र सतत वाद निर्माण केल्यामुळे त्याला तिथून बाहेर काढण्यात आले होते.

नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री सर्व कामगारांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवणाची तयारी केली होती. त्यावेळी मद्यपान सुरू असताना मंगल मांझी आणि देवश्री यांच्यात भाजी चिरण्याच्या काही किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला तो वाद शाब्दिक असला, तरी काही क्षणांतच देवश्री याचा संताप अनावर झाला. त्याने जवळ ठेवलेला चाकू उचलून मंगलवर हल्ला चढवला. धोका ओळखून मंगलने घराबाहेर पळ काढला, परंतु संतापलेल्या देवश्रीने त्याचा पाठलाग करत त्याच्यावर चाकूने पोटात खोलवर वार केला. वार गंभीर झाल्याने मंगल जमिनीवर कोसळले

मध्यस्थी करायला आलेला देखील जखमी

आरडाओरडा ऐकून इतर मजूरही धावत बाहेर आले. संजय निहाल यांनी देवश्रीला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही देवश्रीने हातावर चाकूचा वार केला. घटनेनंतर गंभीर जखमी झालेले मंगल मांझी आणि संजय निहाल यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना मंगलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. देवश्री प्रफुल्ल चंदन यास अत्यंत मद्यधुंद अवस्थेत अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *