मुंबई मेट्रो सुरु झाल्यापासून मुंबईकरांचा प्रवास वेगाने होऊ लागलाय. दररोज लोकलचे धक्के खाणाऱ्या मुंबईकरांना मेट्रोने उत्तम पर्याय दिला. रोज हजारो प्रवासी मेट्रोतून प्रवास करतायत. दरम्यान मेट्रोने दिव्यांगांसाठी प्रवासी तिकिटात सवलत जाहीर केली. पण ही सवलत देताना एक अट देखील ठेवली, ज्यावरुन मेट्रो प्रशासनावर टीका होतेय. ही अट ठेवून मेट्रो प्रशासनाने दिव्यांगांची थट्टा केल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.
मुंबई मेट्रोने 23 नोव्हेंबरपासून दिव्यांगांसाठी 25 टक्के तिकीट सवलत जाहीर केली. पण ही सवलत फक्त MetroConnect-3 अॅपद्वारे मिळते आणि सध्या हे अॅप फक्त iOS (आयफोन) वरच कार्यान्वित आहे. अँड्रॉइड व्हर्जन अद्याप Google Play Store च्या मंजुरीअभावी उपलब्ध नाही. परिणामी, देशातील 90 टक्क्याहून अधिक दिव्यांग जे स्वस्त अँड्रॉइड फोन वापरतात, ते या सवलतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
iPhone मध्यमवर्गीय दिव्यांगांच्या आवाक्याबाहेर
आयफोनची किंमत 80 हजार ते दीड लाखांपर्यंत असते. बहुसंख्य दिव्यांगांना रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक सुविधा मर्यादित असतात. त्यामुळे “आयफोन असला तरच सवलत” ही अट म्हणजे गरीब-मध्यमवर्गीय दिव्यांगांवर अन्याय असल्याची भावना आहे. मेट्रो प्रशासनाने दिव्यांगांचे केलेले हे क्रूर थट्टा असल्याची प्रतिक्रिया दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी व्यक्त केलीय.
तांत्रिक अडचण आधी का सोडवली नाही?
मेट्रो प्रशासनाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. अँड्रॉइड अॅप Google च्या तपासणीत अडकले आहे. पण जेव्हा बहुसंख्य भारतीय अँड्रॉइड वापरतात हे माहिती असताना, अॅप पूर्णपणे तयार झाल्याशिवाय सवलत कशी जाहीर केली? दिव्यांगांना अर्धवट सुविधा देऊन त्यांचीच गैरसोय का केली? असे प्रश्न विचारले जात आहेत.
मेट्रोतील मूलभूत सुविधाही अपुऱ्या
आजही अनेक मेट्रो स्थानकांवर रॅम्प, ब्रेल लिपी, ध्वनी सूचना, लिफ्ट यांची कमतरता आहे. प्रवासासाठी अनेक दिव्यांगांना मदतनीसाची गरज भासते. अशा वेळी केवळ 25% सवलत नव्हे, तर दिव्यांगांसाठी मेट्रो प्रवास पूर्णपणे मोफत असायला हवा, असा युक्तिवाद कार्यकर्ते करत आहेत.
आठवलेंकडून मोफत प्रवासाची मागणी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिव्यांगांसाठी मुंबई मेट्रो पूर्णतः मोफत करण्याची मागणी केली आहे. तसेच अँड्रॉइड अॅप तात्काळ उपलब्ध करून सर्व दिव्यांगांना समान सवलत मिळेल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. ही सवलत श्रीमंत आयफोनधारक दिव्यांगांसाठीच मर्यादित राहिली तर ती खरी सवलत नव्हे, तर दिव्यांग समाजाशी केलेली प्रशासनिक थट्टा ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जातेय.
