अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा, डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग; नागपुरात खळबळ

नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील बगदादी नगर येथे आज सोमवारी सकाळी डेकोरेशनच्या एका मोठ्या गोदामात लागलेल्या भीषण आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत गोदामातील मोठ्या प्रमाणावर डेकोरेशन साहित्य जळून खाक झालं असून लाखोंच्या वरचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने आगीवर वेळेत नियंत्रण मिळवल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग

बगदादी नगर परिसरात तब्बल 10 ते 12 मोठे डेकोरेशनचे गोदाम आहेत. आज सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक गोदामाच्या मागील बाजूने धूर व ज्वाळा उठू लागल्या. क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं आणि संपूर्ण गोदामाला वेढा घातला. परिसरात ज्वालांचे प्रचंड प्रमाण, धूर आणि स्फोटासारखा आवाज झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सामग्री पूर्णपणे जळून खाक

घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंच फायर स्टेशनच्या मदतीने पाणी व फोम स्प्रेच्या सहाय्याने सलग काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत गोदामातील डेकोरेशन सामग्री पूर्णपणे जळून खाक झालेली आहे.

शॉर्ट सर्किटमुळे भीषण दुर्घटना

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं दिसून येत आहे. मात्र, नेमका कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रकिया सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे होणाऱ्या जीव व मालमत्तेच्या धोक्याची जाणीव करून देणारी ठरली आहे. रहिवासी भागाच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणात सजावटीचे, प्लास्टिक व ज्वलनशील साहित्याचे गोदाम चालवले जात असल्याने धोका कायम असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. अशा गोदामांना तात्काळ हटविण्यात यावे, तसेच योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याचा आदेश प्रशासनाने द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *