नोव्हेंबर महिन्याचे 19 दिवस उलटून गेले आहेत. या काळात शाळांना अनेक दिवस सुट्ट्या मिळाल्या. पुढच्या 11 दिवसातही शाळांना काही सुट्ट्या आहेत. या सुट्ट्या राज्यांप्रमाणे बदलतात. तसेच स्थानिक सणांप्रमाणे शाळा तशाप्रकारे सुट्ट्यांबाबत निर्णय घेत असतात. याआधी आपण 1, 11, 14 आणि 15 नोव्हेंबरच्या सुट्ट्यांबद्दल माहिती घेतली. आता 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्ट्या आहेत. कोणत्या ठिकाणी असतील या सुट्ट्या? सविस्तर जाणून घेऊया.
24 नोव्हेंबर 2025 रोजी नववे शीख गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिवस आहे. हा दिवस सोमवार असल्याने आधीचा रविवार 23 नोव्हेंबर मिळून शाळा-महाविद्यालयांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड आदी राज्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या काळात कोणतेही वर्ग, परीक्षा किंवा प्रशासकीय काम होणार नाही. काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सरकारी कार्यालये, न्यायालये बंद
दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगडसह अनेक राज्यांमध्ये सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालये, न्यायालये, महानगरपालिका 24 तारखेला पूर्णपणे बंद राहतील. उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांतही स्थानिक सुट्टी आहे. मात्र पोलिस, रुग्णालय, वीज, पाणी, वाहतूक यासारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.
बँकाही राहणार बंद
रिझर्व्ह बँकेच्या सुट्टी यादीत गुरु तेग बहादूर शहीद दिनाचा समावेश आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, जम्मू-काश्मीरमधील सर्व बँका 24 नोव्हेंबरला बंद असतील. रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट अशी कामे थांबतील. तरीही एटीएम, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग सुरू राहतील. नागरिकांना 22 नोव्हेंबरपर्यंत महत्त्वाची बँक कामे उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गुरुद्वाऱ्यांत विशेष कार्यक्रम
देशभरातल्या गुरुद्वाऱ्यांमध्ये कीर्तन, अखंड पाठ, प्रभातफेरी आणि लंगराचे आयोजन होईल. दिल्लीतील शीशगंज साहिब, अमृतसरचे सुवर्ण मंदिर, आनंदपूर साहिब, पटना साहिब येथे भाविकांची गर्दी होईल.
बलिदानाची आठवण
1675 मध्ये मुघल बादशहा औरंगजेबाच्या जबरदस्ती धर्मांतराला विरोध करताना गुरु तेग बहादूर यांनी दिल्लीत बलिदान दिले. धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणार्पण केले. त्यांचे हे बलिदान आजही सर्वांना शांती, सहिष्णुता आणि न्यायाचा संदेश देत राहते.
