राज्यात तापमानाचा आकडा मोठ्या प्रमाणात घसरला असून, मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात अला असून, सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे इथं करण्यात आली असून, इथं तापमान 6.2 अंशांवर पोहोचलं आहे. कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडीचा कडाका वाढला आहे.
थंडीत वाढला चोरांचा सुळसुळाट…
धुळ्यात कडाक्याच्या थंडीत नागरिकांना एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिथं या थंडीचा लाभ थेट चोरटे घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. धुळे शहरात सध्या कडाक्याची थंडी पडलेली असतानाच, धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घराजवळ अवघ्या शंभर फुटावर असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये मोठी चोरी झाल्याचं वृत्त आहे. शहरातील सर्वात जुनं ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान मंदिरातून सात लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरात मध्यरात्री चोरी झाली असून, या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
चोरीच्या या घटनेमध्ये हनुमानाच्या डोक्यावर असणारा 22 ग्रॅम सोन्याचा मुकूट, टिळक चांदीची छत्री त्याचबरोबर दानपेटी चोरट्यांनी लंपास केली. ही तब्बल सहा ते सात लाख रुपयाची चोरी असून, वाढलेल्या थंडीचा चोरट्यांनी फायदा घेतल्याचं म्हटलं जात आहे. पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात येताच हा चोरीचा प्रकार उघड झाला. धुळे शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथक हे मंदिरात दाखल झालं असून चोरांचा तपास तातडीनं सुरू केला. मंदिरच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्नदेखील या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
उत्तर महाराष्ट्र गारठला…
राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाडा वाढला असून, निफाडचा पाराही 6.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानची नोंद नाशिकच्या निफाडमध्ये झाली असून आता सकाळच्या वेळी इथं धुक्याची दाट चादरही पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमध्ये विदर्भातील नंदुरबार जिल्हा अपवाद ठरत नसून, इथंही थंडीचा कडाका कायम आहे. जिथं मैदानी भागात तापमान 14°c वर तर डोंगराळ भागात तापमान 12 अंश सेल्सियस वर पोहोचलं आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या परिणाम महाराष्ट्रात होत असून, त्यातमुळं थंडीचा कडाका आणखी वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण होणार असून थंडी वाढणार असल्याचा इशारा देण्य़ात आला आहे.
