मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात बांधकाम इमारतीमधून सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडल्यानं एका 19 वर्षीय संस्कृतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता काल मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नाका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर कल्याण पश्चिमेकडील रौनक सिटी परिसरात पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शाळकरी विद्यार्थिनीचा इमारतीच्या 19व्या मजल्यावरुन पडून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिमेकडील रौनक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी विद्यार्थिनीचा इमारतीच्या तब्बल 19व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही विद्यार्थिनी कशी कोसळली? ती 19व्या मजल्यावरच राहत होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. मुलीच्या मृत्यूनं आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
मुंबईत सातत्यानं इमारतींचं बांधकाम सुरु असताना लोकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. कधी गुन्हेगारीनं, कधी अपघातानं किंवा कधी बॉम्बस्फोटाने असुरक्षित वाटणारी मुंबई आता उंच इमारतींच्या बांधकामानेही असुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था राम भरोसे आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. सध्या या घटनेमध्ये चूक कोणाची आहे? कशामुळे ही घटना घडली? यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
