मुंबई लगतच्या ठाणे शहरात राजा रघुवंशी हत्याकांडासारखा प्रकार समोर आला आहे. तीन मुलांच्या आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेतला आहे. महिलेने दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर, त्यानंतर पतीचा मृतदेह उल्हास नदीत फेकून दिला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम येथे राहणाऱ्या एका 44 वर्षीय किसन परमार हा त्याच्या पत्नीसह मनीष परमार आणि तीन मुलांसह राहत होता. त्याला नेहमी व्यापाऱ्याच्या दृष्टीने शहराबाहेर जावे लागायचे. त्याचवेळी त्याच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका लग्न झालेल्या व्यक्ती लक्ष्मण भोईर याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत पतीला कळताच त्याने तिच्याकडे चौकशी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद होत होते.
पतीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री जेव्हा किसन परमार हे झोपले होते तेव्हाच पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याची निर्घृणपणे हत्या केली. तिने पतीची दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला. मध्यरात्री दोघही मोटारसायकलवरुन पतीचा मृतदेह घेऊन बदलापूरच्या वालवली पूलाजवळ आले आणि उल्हास नदीत मृतदेह फेकून दिला. त्यानंतर दोघंही घटनास्थळावरुन पसार झाले.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच कारवाई केली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 आणि 238अंतर्गंत एफआयआर दाखल करण्यात आली होती.
दोन्ही आरोपींना अटक
बदलापूर पश्चिम रपोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी किशोर शिंदे यांनी सांगितलं की, पोलिसांनी आरोपी पत्नी आणि विवाहित प्रियकराला अटक केली आहे. या घटनेची परिसरात चर्चा आहे. पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत.
राजा रघुवंशीसारखे हत्याकांड
मध्यप्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात राजा रघुवंशीची हत्या झाली होती. मागील जून महिन्यात राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली होती.
